भुजबळ वेगळा निर्णय घेतील असे वाटत नाहीः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भुजबळ – शरद पवार भेटीवर भाष्य

Made with LogoLicious Add Your Logo App

भुजबळ वेगळा निर्णय घेतील असे वाटत नाहीः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भुजबळ – शरद पवार भेटीवर भाष्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सोमवारी सकाळीच शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ महायुतीचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. आरक्षणाच्या आडून काही नेते महाराष्ट्र पेटवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. पण पवारांनी त्यांना जवळपास तासाभरापासून वेटिंगवर ठेवले. या घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ कोणताही वेगळा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भुजबळ नुकसानकारक पाऊल उचलणार नाहीत

शरद पवार व छगन भुजबळ यांची भेट होत आहे. ही भेट महाराष्ट्रातील सामाजिक घडामोडींना अनुसरून होत असावी. आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतःच या भेटीचे कारण स्पष्ट करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ महायुतीचे एक मोठे नेते आहेत. त्यामुळे ते महायुतीचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.

MVA जनलाभाच्या योजना बंद करेल

शरद पवारांना भेटण्यात काहीही चुकीचे नाहीत. आम्हीही अनेकदा त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतो. त्यामुळे भुजबळ एखादा निर्णय घेतील असे मला वाटत नाही, असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांच्या एकजुटीमुळे आमचा विजय झाला. आम्ही भविष्यातही एकत्र राहून विजय मिळवू. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर ते जनतेच्या लाभांच्या योजना बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेलाही आमचेच डबल इंजिन सरकार हवे आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.

 

भुजबळ महायुतीत अस्वस्थ असल्याची चर्चा

 

उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ गत काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी हवी होती. पण महायुतीत ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सुटली. त्यानंतर त्यांनी राज्यसभा लढवण्याचीही इच्छा व्यक्त केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरूनही त्यांना व्हिलन ठरवले जात आहे. यामुळेही भुजबळ यांची दुखरी नस दाबली गेल्यामुळे ते महायुतीत प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ते शरद पवारांना भेटणार असल्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here