*पणदूर महाविद्यालयात गुरुवर्य कै.शशिकांत अणावकर यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली*
पणदूर येथील दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे संस्थापक व माजी कार्याध्यक्ष कै.शशिकांत अणावकर सर यांचा प्रथम स्मृतिदिन १६ जुलै रोजी पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात साजरा करण्यात आला. अकादमीचे विद्यमान उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर,सचिव डॉ. अरुण गोडकर, खजिनदार श्री. हरिश्चंद्र कदम,संचालिका सौ.रीना सावंत, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी अणावकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा देणाऱ्या ‘आरंभ‘ या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून तो अंक कै. शशिकांत अणावकर सर यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला.
“वार्षिक अंकाला दिलेले ‘आरंभ’ हे शीर्षक अगदी समर्पक असून आरंभ म्हणजे सुरुवात, तिथे शेवट नसतोच. अणावकर सरांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यशिखराचा सुद्धा कधीच अंत होणार नसून महाविद्यालयाचा आरंभ हा वार्षिक अंक अणावकर सरांना समर्पित करत आहोत” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी प्रास्ताविकातून केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.व इतिहासाचे भान राखूनच सर्वांनी भविष्य घडवायचे असते हा मौलिक संदेशही प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी उपस्थिताना दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अकादमीचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर यांनी गुरुवर्य शशिकांत अणावकर यांनी उभारलेला हा शिक्षणाचा वटवृक्ष आम्ही एक दिलाने सांभाळू असे आश्वासित केले.
अकादमीचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण गोडकर यांनी कै.अणावकर सर यांच्या सोबत अनुभवलेल्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे सर यांनी पत्राद्वारे दिलेल्या श्रद्धांजली संदेशाचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. स्मिता परब यांनी सूत्रसंचालन तर प्रा.श्रुती कोदे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.