दुटप्पी दारूनीतीः राज्यात 50 वर्षांत वाइन शॉपचा एकही नवा परवाना नाही; दारू महागली तरी प्यायचा परवाना 5 रुपयांतच, तोही दुर्लक्षित
वर्धा, गडचिरोली वगळता महाराष्ट्रात कुठेच दारूबंदी नाही. पण मद्यप्राशन, मद्य बाळगणे व वाहतुकीसाठी २१ वर्षे वय व उत्पादन शुल्क विभागाचा परवाना बंधनकारक आहे. परवाना नसणाऱ्यांना ५ वर्षे शिक्षा व ५० हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मात्र, नियमित तपासणी नसल्याने कुणीही परवाना घेण्याच्या भानगडीत पडत नाही. तर अल्पवयीन मद्यपिंचे प्रमाण वाढत असून त्यांचे गुन्हेही वाढत आहेत. दरम्यान, २५ वर्षांत पाणी दुप्पट, बिअर अडीचपट, पेट्रोल चारपट महागले. मद्यपानाचा परवाना अजूनही ५ रुपयांत मिळतो. मात्र हा परवाना सक्तीचा असल्याचे अनेकांना माहीत नाही. महाराष्ट्रात ५० वर्षांत एकाही वाइन शॉपला परवानगी नाही, तरी परवाने स्थलांतरामुळे दुकाने वाढत आहेत. तर, दारूबंदी असणाऱ्या गुजरातमध्ये ६४ वर्षांत ७६ वाइन शॉप उघडले. परवान्यासोबतच बिअर व वाईनच्या सेवनासाठी २१ वर्षे तर हार्ड प्रकारातील मद्यासाठी २५ वर्षावरील वय आवश्यक आहे. या वयाखालील व्यक्तीस मद्य विक्री करणे किंवा परमीटरूममध्ये पिण्यासाठी बसू देण्यास परवानगी नाही.
दारुतून महसूलात संभाजीनगर नंबर वन
२०२० पर्यंत आजीवन व वार्षिक परवाने उत्पादन शुल्क कार्यालयातून न्यावे लागायचे. नंतर ते ऑनलाईन करण्यात आले. पहिल्या वर्षी २०२१-२२ मध्ये ११०४, २०२२-२३-७६२, २०२३-२४-३८० तर २०२४-२५ मध्ये १२० असे एकूण २३६६ परवाने देण्यात आले. २०११ च्या जनणगनेनुसार जिल्ह्यांची लोकसंख्या २७,०१,२८२ आहे. याच्या १०% लोकांनीही परवाने घेतलेले नाहीत. मात्र, मद्यविक्रीतून महसूल देण्यात छत्रपती संभाजीनगर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, हे विशेष.
महाराष्ट्रात परवाना सक्तीचाच
राज्यात कायद्यानुसार मद्यसेवन, सोबत बाळगणे आणि वाहतूक करण्यासाठी परवाना सक्तीचा आहे. त्यामुळे दंड व शिक्षा टाळण्यासाठी परवाना काढायलाच हवा. ही प्रक्रिया ऑनलाइनही उपलब्ध आहे. – संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
५ राज्यांत बंदी, गुजरातेत उत्पन्नाची अट
बिहार व मिझोराममध्ये संपूर्णपणे बंदी, तर गुजरात, नागालँड, लक्षद्वीपमध्ये अटी-शर्तीसह परवाना मिळतो. गुजरातेत ७ प्रकारचे परवाने असून हेल्थ परमिटसाठी वय वर्षे ४०, आरोग्य प्रमाणपत्र, मासिक २५,००० उत्पन्नाची अट आहे.५ रुपये ते १ हजारामध्ये मिळतो मद्यप्राशनाचा परवाना; पण कारवाईच होत नसल्याने उदासीनता
मर्यादेपेक्षा अधिक साठा
परवाना नसताना मद्यनिर्मिती, त्याची वाहतूक किंवा जवळ बाळगणे तर परवाना असणाऱ्यांकडे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक मद्याचा साठा आढळल्यास कलम ६३ अन्वये कारवाई. ३-५ वर्षे कैद, २५-५० हजार दंड किंवा दोन्ही. वाहनही जप्त केले जाते.
बेकायदा जागी मद्यप्राशन
परमिट रूम, बार वगळता अन्य ठिकाणी मद्य पिणाऱ्यांवर कलम ८४ नुसार कारवाई. ५० हजारांपर्यंतचा दंड आकारला जातो.
बेकायदा मद्य पिण्यास जागा देणे
परमिट रूम व बिअर बार वगळता अन्य ठिकाणी मद्य पिण्यास जागा देणाऱ्यांवर कलम ६८ नुसार कारवाई. जागा मालकास ३-५ वर्षे कैद, २५-५० हजार दंड किंवा दोन्हीही शिक्षा होतात.
गुजरातेत पर्यटकांना मिळते मद्य
गुजरातमध्ये १९४७ पासून दारूबंदी आहे. तिथे फक्त पंचतारांकित हॉटेलात परमिट रूम आहेत. पर्यटक,गुजरातमध्ये १९४७ पासून दारूबंदी आहे. तिथे फक्त पंचतारांकित हॉटेलात परमिट रूम आहेत. पर्यटक, परदेशी नागरिक, अन्य राज्यातून आलेल्या नागरिकांना पुरावे दाखवून दारू मिळते. महाराष्ट्रात दारू खुली असताना ५० वर्षांत वाइन शॉपचा एकही नवा परवाना दिलेला नाही. दुसरीकडेच परवाने स्थलांतरित करून शहरात नवीन दुकाने उघडत आहेत. गुजरातेत स्थापनेपासून ७६ वाइन शॉप उघडले आहेत.


















