अखेर राहुल गांधींचा मुंबई दौरा रद्द!
BKC मैदानावर होणाऱ्या सभेवर पोलिसांचा आक्षेप; षण्मुखानंद सभागृहात खरगे मार्गदर्शन करणार
काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच चांगला चर्चेत आला आहे. 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या बीकेसी मध्ये होणाऱ्या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे राहुल गांधी यांची ही सभा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अखेर राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 20 रोजी षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी देखील जोरदार सुरू झालेली आहे. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसी मध्ये त्यांची सभा होणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याआधीच त्यांची ही सभा वादात सापडली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने या सभेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र, आता यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेवर काँग्रेस पक्षाकडून टीका देखील केली गेली. तर मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे आपला आक्षेप नोंदवला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या या आक्षेपामुळे काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच राहुल गांधी यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. आता 20 ऑगस्ट रोजी राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार नाही. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आक्षेप काय घेतला?
राहुल गांधी यांची बीकेसीमध्ये 20 ऑगस्ट रोजी सभा होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र सायन रेल्वे स्थानक रोडवरी ब्रिज बंद झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक बीकेसी मधून जात आहे. त्यामुळे आधीच बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. वास्तविक सायन रेल्वे स्थानकावरील रोडवरील ब्रिजचे काम सुरू असून येथे नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा झाली तर मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी येथील सभेवर आक्षेप नोंदवला आहेत.


















