“कोकणच्या शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेले प्रभू दांपत्य”.. अॅड. नकुल पार्सेकर..
सत्तेच्या परिघात असो वा नसो मा. डॉ. सुरेश प्रभू आणि त्यांच्या जेष्ठ पत्रकार असलेल्या तरीही प्रसिद्धी पराड:मुख असलेल्या मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू हे दांपत्य गेली तीस वर्षाहून जास्त काळ कोकणातील शाश्वत विकासासाठी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता इतर नेत्यासारखे श्रेयवादात न अडकता अगदी शांतपणे झटत आहेत.
केंद्रात विविध मंञालयाचे प्रभावी मंञी म्हणून काम करत असताना प्रभू साहेबांच आपल्या जन्मभूमीवर विशेष लक्ष होत. त्यासाठी विशेषतः दुर्लक्षित ग्रामीण भागात बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, जेष्ठ नागरिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी आणि त्या भागातील समाजासाठी काम करणाऱ्या छोट्या मोठ्या सामाजिक संस्थाच्या सहकार्याने रचनात्मक कामाचं जाळ विणलं.ल्युपिन फाऊंडेशन, मानव संसाधन विकास संस्था, जनशिक्षणच्या माध्यमातून कोकणातील ग्रामीण भागात शाश्वत विकासाची संकल्पना राबवली. गरीब व होतकरु मुलीना नर्सिंगसाठी मोठ्या शहरात जाणे आर्थिक दृष्टीने परवडणारे नाही त्यासाठी कुडाळ तालुक्यातील अणाव या गावात सर्व सोयीचे युक्त अस सुसज्ज नर्सिंग काॅलेज सुरू केल ज्या काॅलेजमधून शेकडो गोरगरीब मुलींना प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनल्या. गेल्या वर्षापासून फिजोथेरपीचा कोर्स पण सुरू केलेला आहे.
खरं तर साहेब व त्यांचा मुलगा अमेय यांची एक ग्लोबल प्रतिमा आहे. त्याचा उपयोग आपल्या देशासाठी कसा करता येईल यासाठी उमा मॅडमसह सर्व कुटुंबच धडपडत असतं. त्यांची ही तळमळ आणि समाजासाठी रचनात्मक कार्य करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अगदी जवळून बघायला, अनुभवायला मिळतात हे खरोखरच माझं भाग्य आहे.
साहेबांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने तसेच गोवा सरकारच्या सहकार्याने गोव्यात दिनांक ८ ते १० नोव्हेंबर या तीन दिवसात डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर Amazing Goa, Global Business Sumit 2024 चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये नाॅर्थ अमेरिका, युरोप, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया, साऊथ ईस्ट आशिया अशा पन्नासहून जास्त देशातील विविध उद्योगातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मानव संसाधन विकास संस्था ज्यांचे संस्थापक मा. सुरेश प्रभू आणि विद्यमान अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून उदयास येत असलेला टाकावू पासून टिकाऊ ही बेसीक संकल्पना घेऊन विशेषतः महिलाना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा वृध्दीं (VRUDDHI) हा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू बनवल्या त्याचाही स्टाॅल होता. ज्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं आग्रहाचे निमंत्रण दोघांनीही आम्हांला दिल होत. साहेब व उमा मॅडमांच्या या सकारात्मक व रचनात्मक चळवळीचे आम्ही एक छोटेसे बिंदू आहोत. त्यामुळे ही दुर्मिळ अनुभूती अनुभवण्याकरिता आम्ही कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी मी, श्री मोहन होडावडेकर, डॉ. नितीन पावसकर, श्री संतोष राणे व श्री हरिश्चंद्र वेंगुर्लेकर या गोवा समीटला भेट द्यायला गेलो. साहेब परदेशी प्रतिनिधींच्या गराड्यात होते. तरीही साहेबांनी जातीनीशी अतिशय आपुलकीने आमचं स्वागत केल.
प्रभू दांपत्याच्या ग्लोबल लिडरशीपची आणखीन एक झलक पहाता आली.